तथाकथित डिजिटल गावातला ‘तो’ तरुण राज ठाकरेंच्या मंचावर, मुख्यमंत्री आपटले तोंडावर
सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डिजिटल गाव’ म्हणून घोषित केलेल्या अमरावतीतील हरिसाल गावातील कथित लाभार्थी मॉडेलच बेरोजगार झाला असून तो गाव सोडून गेल्याचं धक्कादायक वास्तव उघड करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या लाभार्थी तरुणालाच सर्वांसमोर आणून भाजप देशातील जनतेची फसवणूक करत असल्याचा दावा पुन्हा एकदा केला. भाजपची ‘डिजिटल गाव’ ही जाहिरातही खोटी असून या जाहिरातीचं चित्रीकरण हरिसाल गावात झालंच नसल्याच वास्तव राज यांनी सर्वांसमोर आणलंय.
अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे ‘डिजीटल गाव’ असल्याची जाहीरात सरकारकडून करण्यात आली होती. राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत या जाहिराती बद्दलचा एक व्हिडीओ समोर आणला होता. सरकारकडून या गावाबद्दल जाहिरातीत करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंचा दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं. आज राज ठाकरेंनी त्या जाहिरातीत काम केलेल्या हरिसाल गावच्या मनोहर खडके या तरुणालाच मंचावर बोलावले आणि सरकारचा खोटारडेपणा उघड केला. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
सरकारने त्या तरुणाचा ‘डिजीटल गाव’ या जाहिरातीसाठी वापर करुन घेतल्याचा आरोप राज यांनी केला. सरकारच्या ‘त्या’ जाहिरातीतं शुटिंग सुद्धा हरिसाल येथे झालं नसून मुंबईच्या आसपास झाल्याचं राज यांनी सांगितलं. सध्या मनोहर गावाकडचं त्याचं दुकान बंद करुन पुणे-मुंबई कडे रोजगारासाठी फिरत असल्याचंही सांगितलं. तसेच भाजपचे कार्यकर्ते सध्या त्याला शोधत असून त्याला फोन करुन झालं गेलं विसरुन जा, अशी विनवणी करत असल्याचंही राज यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
