मुंबईत पावसाची धुवाधार बरसात; तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर
मुंबई, दि. ३: गेल्या आठवड्यापासून काहीशा विश्रांतीवर गेलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य वैतरणा, मोडकसागर धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मोडकसागर धरणातील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी तर सातारा जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. इगतपुरी घाटातल्या पावसामुळं कसारा आणि इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर दरड कोसळल्यानं तीनपैकी एका अप मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अन्य दोन मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. सांगली जिल्ह्यातल्या कोयना धरणातून ५२ हजार १०० क्युसेक्स, वारणा धरणातून ११ हजार ५७५ क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचं जलसंपदा विभागानं कळवलं आहे.
पाऊस आणि धरणातून विसर्ग यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. सर्व यंत्रणा सतर्क असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेल्या कोलाड रोहा राज्य मार्गाला शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे सायंकाळच्या सुमारास पाले खुर्द आणि अशोक नगर या दरम्यान मोठं भगदाड पडलं आहे.
Source – AIR
