मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाची आजही दमदार हजेरी
मुंबईत आज पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळपासून शहर भागात १२ पूर्णांक ९८ मिलिमीटर, पूर्व उपनगरात २३ पूर्णांक ८६ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात २३ पूर्णांक ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागनं मुंबई, उत्तर कोकण क्षेत्रासाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे. या धरणातला पाणीसाठा आता ९५ टक्क्यांहून अधिक झाल्याने १० टक्के पाणी कपात रद्द झाली आहे. हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे.
तीन चार दिवसांच्या विश्रांती नंतर कालपासून पालघर जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पाऊस सर्वत्र बरसत आहे.
आर्वी परिसरात गेल्या छत्तीस तासापासून पाऊस सुरू सुरु असल्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहेत तसंच अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा धरणाचेही पाणी सोडण्यात आल्याने देऊरवाडा, कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आर्वी – अमरावती मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सेलु तालुक्यातल्या खैरी या गावाजवळुन वाहणा-या धाम नदीची पाणी पातळी वाढल्यानं पुल पाण्याखाली जाऊन इतर गावाशी संपर्क तुटला. गेल्या २० वर्षांपासुन तिथं उंच पूल उभारण्याची मागणी होत आहे आणि दरवर्षी ग्रामस्थाना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिवृ्ष्टी झाल्यानं गोसेखुर्द धरणाचे २५ दरवाजे ३ मीटरने तर ८ दरवाजे अडीच मीटरने उघडले असून, त्यातून १९ हजार १८४ क्यूसेक्स पाणी सोडलं जात आहे. यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातला हा सर्वाधिक विसर्ग आहे, अशी माहिती गडचिरोली जिल्हा आपत्ती निवारण कक्षानं दिली.
वाशिम जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांती नंतर काल पावसाचं पुनरागमन झालं. रात्री उशिरा जिल्ह्यातल्या कारंजा, मंगरूळपीर, किंहिराजा, शेलुबाजार, मालेगांव, वाशिम शहरात पावसाला काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सुरुवात झाली. या पावसाने शेतकरी मात्र धास्तावला आहे. गेले दोन आठवडे सुरू असलेल्या पावसामुळे मुगाचं पीक हातचं गेलं, तर आता पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे उडीद आणि सोयाबीन या पिकांचं काय होईल याची चिंता जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सतावत आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीच्या धरणाचे चार दरवाजेही आज सकाळी उघडले, त्यातून ४४ हजार ८२१ क्यूसेक पाणी सोडलं जात आहे.
Source – AIR
