कोरोना काळात ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा(खोपटे) तर्फे रहिवाशांची एक वर्षाची घरपट्टी माफ
उरण, दि.१२(विठ्ठल ममताबादे): कोरोना काळात नागरिकांचे होत असलेले हाल, आर्थिक परिस्थितीचा विचार करता गोरगरिबांना न्याय देता यावा तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सवलत मिळावी या दृष्टिकोनातून निरपेक्ष वृत्तीने, निःस्वार्थ भावनेने ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडाचे उपसरपंच सुजित भालचंद्र म्हात्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य रितेश सदानंद ठाकूर यांच्या पुढाकारातून ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) मधील सर्व रहिवाशांचे, ग्रामस्थांचे सन २०२०-२१ या काळातील घरपट्टी शुल्क माफ करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे असा ऐतिहासिक व महत्त्वाकांक्षी निर्णय घेणारी बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
देशावर आलेल्या Covid-19 या संकटामुळे सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे खोपटे गावातील जनता ही पहिले तीन-चार महिने Covid-19 च्या भीतीने घरातच राहिली. त्यामुळे अनेक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर काहींना अर्धे पगार मिळाले, तर काहींना पगारच मिळाले नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती कोरोनाच्या काळात बिकट झाली होती. तर हातावर पोट भरणाऱ्यांची स्थिती याहून गंभीर होती. खोपटे ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्नही भरपूर असल्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. या दरम्यान घरोघरी जाऊन घरपट्टी वसुली करणे चालू होते दरम्यान घरपट्टी भरणे ग्रामस्थांना शक्य नव्हते. त्यामुळे ही घरपट्टी घेणे त्वरित थांबविण्यात यावे व सन २०२०-२१ चालू वर्षात घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावी तसेच ज्यांच्या घरी जाऊन घरपट्टी वसूल करण्यात आलेली आहे त्यांना ती परत देण्यात यावी व गोरगरीब जनतेला न्याय देण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुजित म्हात्रे व ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर यांनी ग्रामसेवक डी. एम. तुरे यांच्याकडे केली होती.
घरपट्टी माफ करण्याच्या सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर यांच्या मागणीचा विचार करत ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) या ग्रामपंचायतीची मासिक सभा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० रोजी सर्व सदस्यांच्या मदतीने घेण्यात आली. विषय नंबर १५ अन्वये ठराव नंबर ६३ द्वारे ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीतील सर्व ग्रामस्थांचे सन २०२०-२१ दरम्यानची घरपट्टी माफ करण्यात आली.
