गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर लावल्यामुळे वाहतूक कोंडी – अपघात होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश लागू
अलिबाग, दि. ४: जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हा शांतता समिती बैठक दि. ३० ऑगस्ट २०२४ आयोजित करण्यात आली होती. राज्यामध्ये दि. ७ ते दि. १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या गणेशोत्सवावेळी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे मोठे मोठे बॅनर लावेल जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता असते तसेच काही वेळा शुभेच्छांच्या बॅनरवर वादग्रस्त राजकीय टिका टिप्पणी करणारा चारित्र्य हनन करणारा मजकूर लिहलेला असतो, त्यामुळे राजकीय मतभेद होऊन शांतता भंग होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर रस्त्यावर लावण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा शांतता समिती सदस्यांनी सदर बैठकीमध्ये विनंती केली आहे.
त्यानुसार रायगड जिल्हयातील (पोलीस आयुक्तालय नवी मुंबई कार्यक्षेत्र वगळून) सर्व क्षेत्रामध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात व कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये, म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मनाई आदेश लागू केला आहे.
