महसूल पंधरवड्यातर्गत रायगड जिल्ह्यात विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
अलिबाग,दि. २: महसूल विभागामार्फत दि. १ ऑगस्ट पासून ते दि. १५ ऑगस्टपर्यंत ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच दि. १ ऑगस्ट पासून ते दि. १५ ऑगस्टपर्यंत या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
या महसूल पंधरवडानिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत
दि. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, २ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, ३ ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, ४ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, ५ ऑगस्ट रोजी “कृषी मार्गदर्शक कार्यक्रम”, ६ ऑगस्ट रोजी “शेती पाऊस व दाखले”, दि. ७ ऑगस्ट रोजी “युवा संवाद”, दि. ८ ऑगस्ट रोजी “महसूल जनसंवाद”, दि. ९ ऑगस्ट रोजी “महसूल ई-प्रणाली”, दि. १० ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, दि. ११ ऑगस्ट रोजी “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन”, दि. १२ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा-दिव्यांगांच्या कल्याणाचा”, दि. १३ ऑगस्ट रोजी “महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी संवाद व प्रशिक्षण”, दि. १४ ऑगस्ट रोजी “महसूल पंधरवडा वार्तालाप”, दि. १५ ऑगस्ट रोजी “महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ”.
महसूल पंधरवडानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
