सरकारी बंगला सोडण्याची मिळाली नोटिस
नवी दिल्ली, दि. २७: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांना आता त्यांचा सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी १२ तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. नोटिस नुसार राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे.
सुरत न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2019 मध्ये दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.
लोकसभा सचिवालयाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांचा अपात्रतेचा आदेश २३ मार्चपासून लागू होईल. अधिसूचनेत म्हटले आहे की, राहुल गांधी यांना संविधानाच्या कलम १०२ (१) आणि लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ८ नुसार अपात्र ठरवण्यात आले आहे.
