पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसी वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक
पुणे, दि.८: एका बाजूला कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असताना पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसी वाया जाण्याचे प्रमाणही सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. राज्यात हे प्रमाण सरासरी २ पूर्णांक ५ दशांश टक्के आहे; तर पुणे जिल्ह्यात लसी वाया जाण्याचे प्रमाण ३ पूर्णांक ६६ शतांश टक्के असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील लोकसंख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली असल्याचे नव्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. आधीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील लसीसाठी पात्र नागरिकांची संख्या सुमारे ५८ लाख होती मात्र आता ही संख्या साडे ८७ लाखांच्या जवळपास पोचली आहे. नव्या आकडेवारीनुसार आता नेमक्या किती लोकांचे लसीकरण झाले आहे आणि किती बाकी आहेत याची माहिती घेतली जात असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके यांनी सांगितले.