मनीषा धारणे यांच्या पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशन कडून पुणे पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार
पुणे, दि. २१ : गेली अनेक दशके पुण्याची ओळख शिक्षणाचं माहेरघर अशीच होती. परंतू, मागील काही वर्षांपासून जसजसा पुणे शहर व परिसराचा वेगाने विकास होत गेला तस-तसा गुन्हेगारीचा आलेख वाढत गेला. आणि एक वेळ अशी आली की ‘पुणे हे गुन्हेगारांचं नवं माहेरघर’ होतंय की काय असं वाटायला लागलं. गुन्हेगारी टोळ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजाश्रय मिळत गेला व पोलिस यंत्रणाही हतबल झाली. या काळात अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं. अखेर पाणी डोक्यावरुन जात चाललंय याची जाणीव झाल्यावर तत्कालीन ठाकरे सरकारने कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित असलेले अमिताभ गुप्ता(IPS Amitabh Gupta) यांची पुणे शहर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली. दोन वर्षातल्या आपल्या या कार्यकाळात आजमितीस त्यांनी १०२ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केलीय तर एमपीडीए कायद्यानुसार एकूण ७८ गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी केली. पुणे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी ‘पोलिस आरोग्य मित्र फाऊंडेशन’ ने काल दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी पुण्यातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाङगीळ यांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची दीर्घ मुलाखत घेतली. यावेळी पुणे पोलिसांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना आयुक्त गुप्ता म्हणाले की, “शहरातील गुन्हेगारी वाढली होती. खंडणी, जमीन बळकावणे, व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवून समाजात दहशत पसरविणे, कारागृहातून सुटल्यावर रॅली काढणे अशा प्रकारांमुळे पुणेकर त्रस्त झाले होते. याच वेळी आम्ही गुन्हेगारांवर ‘मोक्का’ व ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे वाढत्या संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात यश आलं व पुण्यात शांतता प्रस्थापित होण्यासही मदत झाली.”
वाढत्या सायबर गुन्हेगारीबाबत बोलताना अमिताभ गुप्ता म्हणाले की, “लालच दाखवल्यावर आपणा डोके कसे वापरतो, यावर सायबर सुरक्षा अवलंबून आहे. फसवणूक झाल्याझाल्या पहिल्या २-३ तासात जर पीडित व्यक्तीने हालचाल करत तक्रार नोंदवली तर पोलिसांना अशा प्रकरणांत पैसे वसूल करणे सोप्पे जाते. सध्या नियमित प्रकारातील गुन्ह्यांपेक्षा लोन App आणि सेक्सटॉर्शन अशा स्वरुपातील सायबर गुन्हेगारी वाढत असून, याला आळा घालण्यासाठी पाच विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.”

मूळचा पत्रकारितेचा पिंड असलेल्या सुधीर गाङगीळ यांनी कधी हलक्या फुलक्या तर कधी थेट पुण्यातील वाहतूक कोंडी सारख्या प्रश्नांची गूगली टाकत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे एका बाजूला ही मुलाखत चालू असताना दुसर्या बाजूला अभिनव कला महाविद्यालयाचे एक माजी विद्यार्थी असलेले अमित ढाणे हे आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे स्केच बनवण्यात गुंग झाले होते. तयार झालेले हे स्केच जेव्हा गुप्ता यांना देण्यात आले तेव्हा ते अक्षरशः भारावून गेले.
पोलिस आरोग्य मित्र फाऊंडेशन(Police Arogya Mitra Foundation) च्या अध्यक्षा मनीषा धारणे (Manisha Dharne) यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे इतर पदाधिकारी विनायक धारणे, डॉ. प्रसन्न परांजपे, दिलीप टिकले व अॅड. तानाजी गायकवाड आदींनी पोलिस आरोग्य मित्र फाऊंडेशनच्या वतीने सह-पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस अधीक्षक मीतेश घट्टे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांचा विशेष सत्कार केला. बाहेर मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असताना देखील पुणेकरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लक्षणीय होती.
