बँकांच्या निष्क्रिय खात्यातून अब्जावधी रुपये लंपास करण्याच्या तयारीत असलेल्यांना पुणे पोलिसांनी केले जेरबंद; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलालाही ठोकल्या बेड्या
पुणे: विविध बँकांच्या निष्क्रिय खात्यातून अब्जावधी रुपये लंपास करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने जेरबंद केलं आहे. यामध्ये औरंगाबाद इथल्या एएम न्यूज या खासगी वृत्तवाहिनीचे राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू तसंच प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याचा समावेश आहे. या सर्वांनी आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर बँकातील निष्क्रिय खात्यांची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती.
ही सर्व खाती हॅक करून, बँक खात्यांमध्ये जमा असलेले २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये आपल्या खात्यात वळवण्याचा त्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी २५ लाख रुपये रोख आणि ४३ लाख ५४ हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त केलं. या सर्वांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
