केंद्रीय पथकाचं स्पष्ट मत
पुणे: कोणत्याही जिल्ह्यातील वाढता कोरोना टाळण्यासाठी टाळेबंदी हा अंतिम उपाय असूच शकत नाही असं स्पष्ट मत केंद्रीय पथकानं व्यक्त केलं असून त्यावर व्यापक चर्चा झाल्यानंतरच पुण्यात टाळेबंदी लागू न होता निर्बंध आणखी कडक करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या नियमित कोरोना आढावा बैठकीत केंद्रीय पथकानं व्यक्त केलेला टाळेबंदीविषयक अभिप्राय राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ . प्रदीप आवटे यांनी सादर केला.
केंद्रीय पथकासोबत डॉ. आवटे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा केला असून टाळेबंदी हा उपाय कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात योग्य ठरतो, सद्यस्थितीत टाळेबंदी नको तर तपासणी आणि चाचण्यांची संख्या वाढवून, त्याचबरोबर रुग्णांवर वेळीच योग्य उपचार करून ही साथ रोखणे शक्य असल्याचं स्पष्ट मत या पथकानं व्यक्त केल्याचं डॉ. आवटे यांनी सांगितलं.
टाळेबंदीऐवजी निर्बंध अधिक कडक करुन रुग्ण शोधून त्यांना विलगीकरणात ठेवण्यावर त्याचबरोबर चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्याचवेळी लसीकरणावर अधिक भर देऊन जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावरही बैठकीत एकमत झाले. शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता त्यादृष्टीनं कामाला लागली आहे.
