
राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
पुणे, दि. १०: शिक्षणाचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात एका घटनेने माणुसकिला काळिमा फासली आहे. एका विवाहित महिलेच्या सासरच्या मंडळींनी तिच्या मासिक पाळीचे रक्त विकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडितेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे, सासरे आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सर्व २०१९ पासून सुरू झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित तरुणी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहते. पीडित तरुणी आणि तिच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. यानंतर सासरच्यांनी तिचा मानसिक छळ सुरू केला. अघोरी विद्या पाहता सासरच्यांनी मासिक पाळीत पीडितेचे हात पाय बांधले. कापसातून तिच्या मासिक पाळीचे रक्त काढून ५० हजार रुपयांना जादूटोणा करून विकले. पीडितेने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत आहे.