प्रविण गायकवाड यांचा असंख्य कार्यकर्ते उपस्थित काँग्रेस प्रवेश
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी आज राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गायकवाडांच्या पक्ष प्रवेशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
काँगेसच्या तिकीटावर पुण्यात प्रवीण गायकवाड निवडणुक लढण्यास असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. पुण्यातील जागेसाठी काँग्रेस कडून अनेकांची नावे पुढे आली होती. त्यातच शुक्रवारी दिल्ली आणि पुण्यात घडलेल्या घडामोडीनंतर गायकवाड यांचे मागे पडलेले नाव पुन्हा पुढे आले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पुण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून तो संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, अशी प्रतिकिया अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली आहे. चव्हाणांच्या या विधानानंतर पुण्यात प्रवीण गायकवाडांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळेल कि नाही याबद्दल खात्री वाटत नाही. पुणे लोकसभा मतदारसंघात अजूनही काँग्रेसला उमेदवार मिळालेला नाही. या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली नसली तरी आमदार मोहन जोशी व नगरसेवक अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.
