पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाचा वापर केंद्र सरकार राजकारणासाठी करत आहे
नवी दिल्ली : १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर पाकिस्तानाने भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याचा निषेध करताना केंद्रातील सत्ताधारी भाजप-रालोआविरोधी २१ राजकीय पक्षांनी संयुक्त निवेदनाद्वारे पाकिस्तानविरुद्ध भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्टाईकची प्रशंसा केली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांवर भाजप राजकारण करत आहे, अशी टीका २१ पक्षांच्या नेत्यांनी केली.
संसद भवन परिसरात २१ पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली असून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दय़ाचा वापर राजकीय फायद्यासाठी करू नये, अशी मागणी संयुक्त निवेदनात करण्यात आली आहे. पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध विरोधकांनी केला आहे. बैठकीत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली असून, सैन्याच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक न बोलावल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, एलजेडीचे शरद यादव, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, राजदचे मनोज झा, माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल तसेच डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी आणि सुधाकर रेड्डी उपस्थित होते.
