लस मिळाल्यानंतरही खबरदारी घेण्याची आणि लसविषयक नियमांचे पालन करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नंतर, अत्यावश्यक सेवेतील लोक आणि देशाची सुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या सर्वांना लस दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आपली सुरक्षा दले, पोलीस कर्मचारी, अग्निशमन अधिकारी, सफाई कामगार या सर्वांना प्राधान्य दिले जाईल. या सर्वांची संख्या साधारण तीन कोटी इतकी असून त्यांचा लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार वहन करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
लसीकरण मोहिमेसाठी करण्यात आलेल्या व्यापक आणि जय्यत तयारीची त्यांनी माहिती दिली, तसेच सर्वांनी लसीच्या दोन्ही मात्रा न चुकता घ्याव्यात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दोन मात्रांमध्ये (डोसेस) एका महिन्याचे अंतर असेल, असे ते म्हणाले. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोविड प्रतिबंधनासाठीची सर्व खबरदारी घेत नियमांचे पालनही सुरु ठेवायचे आहे, कारण ही लस (दोन्ही मात्रा) घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी मानवी शरीरात कोरोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती विकसित होऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.
कोरोना विरुधाच्या लढाईत सर्व नागरिकांनी जो संयम आणि एकजूट दाखवली तसाच संयम लसीकारण मोहिमेदरम्यानही दाखवावा, असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले.
