“गेल्या दीड महिन्यात आपण हजारो लोकांचे जीव वाचवू शकलो” – मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि वरिष्ठ अधिकारी ही या बैठकीत सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशांचं राज्यांनी काटेकोरपणे पालन करावं. तसंच लाल क्षेत्रांच रुपांतर केशरी आणि त्यानंतर हरित क्षेत्रामध्ये करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत, असंही ते म्हणाले.
देशाने आतापर्यंत दोन वेळा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आता पुढे काय आणि कसं करायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले. अर्थव्यवस्था आणि कोविड १९ विरोधातल्या लढ्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले.
कोरोना विषाणू संसर्गामुळं कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. गेल्या दीड महिन्यात आपण हजारो लोकांचे जीव वाचवू शकलो असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. सद्यस्थिती आणि पुढे घ्यायची खबरदारी याविषयी त्यांनी चर्चा केली.
आणखी काही महिने कोरोना विषाणूचा परिणाम जाणवत राहील असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणं आणि मास्क लावणं कायम ठेवणे पुढचा काही काळ आवश्यक राहणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
अनेक लोक सर्दी, खोकला झाल्याचं स्वतःसांगत आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे, असंही त्यांनी सांगितलं. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा जनतेला केले आहे.
