PMO SEOUL
दक्षिण कोरियातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी सेऊल शांतता पुरस्काराने सन्मानित
दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदींना सेऊल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता हा पुरस्कार देण्यात आला आहे. ते सध्या दोन दिवसांच्या दक्षिण दौऱ्यावर आहेत. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कारासह १ कोटी ३० लाख रोख रक्कम देण्यात आली. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचे मोदींनी सांगितले.
पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा पुरस्कार माझा नसून सर्व भारतीयांचा आहे. गेल्या पाच वर्षात भारताने जे यश मिळवले त्याचा हा सन्मान आहे. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत आहे त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणे माझे भाग्य आहे.
तसेच मोदींनी यावेळी दहशतवादावरही भाष्य केले. सेऊल ऑलिम्पिकच्या काही आठवडे आधी अल कायदा नावाची संघटना उदयास आली. आज दहशतवाद आणि धर्मांध शक्तींचा वाढता प्रभाव जगासाठी धोका ठरत आहे. देशात शांतता आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरज आहे. द्वेष नष्ट करत शांतता नांदावी यासाठी हाच एकमेव मार्ग आहे.
