दुधासाठी किटल्या व बाटल्या तयार ठेवा; दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिन्याभरात बंदी लागू : रामदास कदम
मुंबई: दुधासाठी स्टील ची किटली किंवा भांडं तयार ठेवा. कारण आता प्लस्टिक बंदी चा दुसरा अध्याय सुरू होत आहे. आज विधानसभेत प्लास्टिक बंदी बाबत काही आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एक अनपेक्षित घोषणा केली. येत्या एक महिन्यात दुधासाठीच्या प्लास्टिक वर बंदी लागू करण्यात येणार आहे. पण यात मध्यम मार्गही त्यांनी दिलाय जर ग्राहकाने पिशवीतलं दूध घेतलं आणि ती पिशवी परत दुकानदारास आणून दिली तर त्या ग्राहकाला ५० पैसे परत देण्याची तयारी दूध कंपन्यांनी दाखवली आहे.
प्लास्टिक बंदीबाबत विधानसभेत बोलताना रामदास कदम म्हणाले की महाराष्ट्राला दिवसाला १ कोटी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर येतात व त्यामार्फत ३१ टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. या गंभीर समस्येवर तोडगा करण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी येत्या एक महिन्यात लागू केली जाणार आहे. पुढे प्लास्टिक बंदी च्या कारवाई बाबत उत्तर देताना ते म्हणाले की आधी राज्यात १२०० टन प्लास्टिक कचरा तयार व्हायचा पण बंदी नंतर त्याचं प्रमाण थेट ६०० टनावर आलं. त्यातही गुजरात राज्यातून इतर राज्यांच्या तुलनेत ८० टक्के अधिक प्लास्टिक महाराष्ट्रात येतं.
