पेट्रोल आणि डिझेलवरच्या केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
पेट्रोल आणि डिजेल वरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या ट्वीटर संदेशात दिली. त्यानुसार पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ६ रुपयांनी कपात केली जाणार आहे. या निर्णयामुळे दर वर्षी सरकाला सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावं लागणार आहे, असंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे.
सर्व राज्य सरकारांना, विशेषत: ज्या राज्यांमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेवटच्या फेरीत कपात केली गेली नव्हती, त्यांनीही अशीच कपात लागू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं आवाहन केलं आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना १२ सिलिंडरपर्यंत प्रति गॅस सिलिंडर २०० रुपये सबसिडी दिली जाण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे वर्षाला सुमारे ६ हजार १०० कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. देशाची आयात अवलंबित्व जास्त असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी सरकार कच्चा माल आणि मध्यस्थांवरील सीमाशुल्क देखील कमी करत आहे. यामुळे अंतिम उत्पादनांची किंमत कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
