शरद पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्वाची मागणी
मुंबई, दि. ३: महाराष्ट्रात उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यातील अनेक भागातील जनता दुष्काळाने होरपळत असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. दुष्काळाचा सामना करण्याची मागणी पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
शरद पवार यांनी पत्रात लिहिले आहे की, “ज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल ! त्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी, ही अपेक्षा!”
शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, “गेल्या दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. राज्यातील पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे. संपूर्ण मराठवाड्यात भीषण जलसंकट आहे. उपाययोजना केल्या जात असतानाही, दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. नंदुरबार, नाशिक, जळगाव, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. “शहरी आणि ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत. पुणे, कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे.
