“मणिपूरबाबत मोदी सरकारची भूमिका बघ्याची” – खा. शरद पवार
औरंगाबाद, दि. 16: देशातलं वातावरण मोदी सरकारला अनुकूल दिसत नसून, येत्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलत होते. २०२४ ला केंद्र तसंच राज्यात चित्र बदलण्यासाठी जे काही करावं लागेल, ते करू. देशात बदल हवा, म्हणूनच ‘इंडिया’ आघाडी ची स्थापना केल्याचं ते म्हणाले. मणिपूरबाबत मोदी सरकारची भूमिका बघ्याची असल्याची टीका पवार यांनी केली. राजकीय नेत्यांपेक्षा प्रभावी असलेली ईडी ही शक्ती राजकारणातले अनेक निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
निवडणूक आयोगानं नोटीस देऊन चिन्हाबाबत उत्तर मागितलं, ते दिलं आहे. मात्र शिवसेनेसोबत झालेला प्रयोग पाहता, तोच प्रयोग आपल्यासोबत होण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली. आपण आजवर १४ निवडणुका लढलो, बहुतांश निवडणुका वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो. मात्र चिन्हं बदलूनसुद्धा जिंकलो, त्यामुळे चिन्हाची चिंता नाही, असं त्यांनी सांगितलं.
