पनवेल येथे संचारबंदी मोडून वाढदिवस साजरा करणाऱ्या भाजप नगरसेवकावर पोलिसांची धडक कारवाई
पनवेल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यातही महाराष्ट्रात तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण काही जनतेचे प्रतिनिधीच कायदा पायदळी तुडवायला लागले आहेत. पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अजय तुकाराम बहिरा यांनी काल वाढदिवसानिमित्त काही मित्रांना घरी बोलावून वाढदिवस साजरा करत संचारबंदीच्या आदेशालाच वेशीवर टांगले.
नगरसेवक बहिरा हे भाजपचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या प्रभागात मास्क वाटपाचा कार्यक्रम केला होता. पण काल रात्री ११ च्या सुमारास इमारतीच्या टेरेस वर आपला वाढदिवस साजरा करताना नेमक्या त्याचवेळी एका सजग नागरिकाच्या तक्रारीवर पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्याही जप्त केल्या. नगरसेवकासह उपस्थित सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रात सत्तेत असलेल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या नगरसेवकाकडूनच जर कायद्याचे उलंघन होत असेल तर ही फारच चिंतेची बाब आहे. काल सकाळीच खारघर येथील कोरोना पॉसिटीव्ह रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आणि या घटनेला २४ तास उलटण्या आधीच नगरसेवकाने वाढदिवसाची पार्टी करणे नक्कीच निंदनीय आहे.
