“पानिपत” चे पोस्टर रिलीज; अर्जुन कपूर सोबत मराठमोळा कश्यप परुळेकर दिसेल प्रमुख भूमिकेत
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित बहुचर्चित “पानिपत” या हिंदी चित्रपटाचे पोस्टर आज रिलीज झाले आहे. अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रीती सेनॉन, मोहनिश बेहेल, पद्मिनी कोल्हापुरे आणि मराठमोळा कश्यप परुळेकर हे प्रमुख भूमिकेत असून मिलिंद गुणाजी, गश्मिर महाजनी, कृतिका देव, अजित शिधये, सुहासिनी मुळे हे सह कलाकार आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी राहीलेल्या विषयांशी संबंधित चित्रपट बनवण्यात आशुतोष गोवारीकर यांचा मोठा हातखंडा राहिलाय. मध्ययुगीन काळातला “जोधा अकबर” हा ब्लॉकबस्टर मुव्ही ठरला होता. पानिपत चित्रपट हा आशुतोष गोवारीकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे मानले जाते. या चित्रपटासाठी त्यांनी आणि त्यांच्या टीम ने खूप मेहनत घेतली असून मराठ्यांच्या आणि एकूणच भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण घटना ठरलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युध्दाशी निगडित मराठ्यांच्या अनेक दुःखद तसेच शौर्यपूर्ण आठवणी आहेत. या साऱ्याचा सखोल अभ्यास आशुतोष गोवारीकर यांनी केलाय. येत्या काही दिवसात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
