टीआरएफ दहशतवादी संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
पहलगाम, दि. २२: जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात पहलगाममधल्या बैसरण भागात पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात महाराष्ट्रातील दोन पर्यटक मृत्युमुखी पडले असून त्यांची नावे अनुक्रमी दिलीप डिसले आणिअतुल मोने आहेत. यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती स्पष्ट झाल्यावर मृतांचा अधिकृत आकडा समोर येईल, असं जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं आहे.
या हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पर्यटकांवर हल्ला करण्याचा हा प्रकार धक्कादायक आणि वेदनादायक असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर हल्लेखोरांना कठोर शिक्षा दिली जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ असून तो आणखी मजबूत होईल, असं प्रधानमंत्री म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कठोर शासन केलं जाईल, असं शहा म्हणाले आहेत. शहा यांनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या हल्ल्याच्या घटनेची माहिती दिली असून तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी ते श्रीनगरला रवाना झाले आहेत. त्याआधी गृहमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह देशभरातल्या राजकीय नेत्यांनी आणि इतर मान्यवरांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
Source – AIR
