अशी कृती शाळांना पडू शकते महागात
मुंबई, दि.१: विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करणारी कोणतीही कारवाई करणं बेकायदेशीर आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. अशी कारवाई करणाऱ्या शिक्षण संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
शिक्षण हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, कोणतीही शाळा किंवा शाळेचं व्यवस्थापन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ऑनलाइन प्रवेश नाकारणं, परीक्षेचा निकाल अडवून ठेवणं, परीक्षेला बसू न देणं, शाळेतून काढून टाकणं या बेकायदेशीर कारवाया आहेत. त्याबाबत येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घ्यावी, आणि अशा शाळांची नोंदणी रद्द करावी, असे निर्देश सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.
