ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
मुंबई: कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं इतर देशातून येणार्या प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांना प्रवासाआधी एयर सुविधा पोर्टलवर आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल तसंच, १४ दिवसांचा प्रवासाचा तपशील अपलोड करणं बंधनाकारक करण्यात आलं आहे.
प्रवासाच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. विषाणूचा प्रभाव अधिक असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर कोविड चाचणी करावी लागणार आहे. १ डिसेंबरपासून या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना, ओमिक्रॉनसंदर्भात सतर्क राहून प्रतिबंधात्मक कारवाईसह लसीकरणाची व्यापकता वाढवण्याचं, पत्राद्वारे सूचित केलं आहे.
अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याची सूचना, राजेश भूषण यांनी केली आहे. कोविड चाचण्यांबाबतची यंत्रणाही बळकट करण्याचं या पत्रातून सूचित करण्यात आलं आहे. प्रभावित क्षेत्र, विलगीकरण, पाठपुरावा आणि उपचार याची खबरदारी घेण्याचंही सर्व राज्य सरकारांना सांगण्यात आलं आहे
