भाजपाच्या ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या सभापतीपदी निवड
नवी दिल्ली, दि. २६: भाजपाचे ज्येष्ठ खासदार ओम बिर्ला यांची आज लोकसभेच्या सभापतीपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली. निवड झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेस नेता राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना आसनापर्यंत नेलं.
बिर्ला यांची दुसऱ्यांदा निवड होण्यानं इतिहास रचला गेल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली. बिर्ला यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची विधेयकं लोकसभेत मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या कार्यकाळात ९७ टक्के विधायक काम झाल्याचं मोदी म्हणाले. संसद सदस्यांची वर्तणूक आणि उत्तरदायित्व यामुळे जनतेचा संसदीय लोकशाहीवरचा विश्वास वाढतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
तत्पूर्वी आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या इतर नेत्यांनी बिर्ला यांची सभापतीपदी निवड करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि समाजवादी पक्षाचे आनंद भदौरिया यांनी काँग्रेसचे सभापतीपदासाठीचे उमेदवार कोदिकुन्निल सुरेश यांना अनुमोदन देणारा प्रस्ताव मांडला. पण विरोधी पक्ष मतदानाविषयी आग्रही न राहिल्यामुळे बिर्ला यांची आवाजी मतदानानं निवड करण्यात आली.
