१०५० हून अधिक नागरिकांनी व स्वच्छताकर्मींनी स्वच्छ केली नवी मुंबईतील ८ विभागातील धार्मिक प्रार्थनास्थळे
नवी मुंबई, दि. २६: स्वच्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत १७ सप्टेंबर पासून दररोज स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जात असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वर्दळीची ठिकाणे तसेच दुर्लक्षित स्थळांच्या सफाईकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे या मोहीमेचा प्रारंभही अनंत चतुर्दशीदिनी मोठया प्रमाणात होणा-या गणेश विसर्जन सोहळयानंतर लगेचच दुस-या दिवशी सकाळी सर्व विसर्जन स्थळांच्या सफाई मोहीमेने करण्यात आला. त्यानंतरही खाडी किना-यांवरील खारफुटी परिसर, रेल्वे स्टेशन, एपीएमसी मार्केट अशा विविध स्थळांवर सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर देण्यात आला व नागरिकांनीही सर्वच मोहीमांना उत्साही प्रतिसाद दिला.
अशाचप्रकारे आज आठही विभाग कार्यालयांमार्फत त्या त्या कार्यक्षेत्रातील धार्मिक प्रार्थनास्थळांची स्वच्छता मोहीम प्रार्थनास्थळांचे पदाधिकारी, तेथील स्वयंसेवक व कर्मचारी तसेच प्रार्थनास्थळाशी संबधित भाविक नागरिक आणि एनएसएसचे विद्यार्थी आणि महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र अशा १०५० हून अधिक नवी मुंबईकरांच्या एकत्रित सहयोगातून राबविण्यात आली.
प्रार्थनास्थळांमध्ये अंतर्गत स्वच्छतेची काळजी घेतली जाते मात्र त्या सभोवतालच्या परिसर स्वच्छतेकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. ही बाब नजरेसमोर ठेवून स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतेची विशेष मोहीम अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील प्रार्थनास्थळांवर राबविण्यात आली. सर्व ठिकाणी स्वच्छता आणि प्लास्टिक प्रतिबंधाची सामुहिक शपथ घेण्यात आली. यामध्ये – बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात सहा.आयुक्त शशिकांत तांडेल व स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली सीबीडी किल्ले गावठाण येथील गोवर्धनी माता मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
नेरुळ विभाग कार्यक्षेत्रात सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे आणि स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या माध्यमातून लोकसहभागातून इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिराची अंतर्गत व परिसर स्वच्छता करण्यात आली.
वाशी विभागात से. ९ येथील गुरुव्दारा व्यवस्थापनाच्या सहयोगातून सहा.आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली गुरुव्दारा परिसराची तसेच आतील भागाची सखोल स्वच्छता करण्यात आली. सफाईमध्ये जेटींग मशीनव्दारे प्रक्रीयाकृत पाणी फवारणीव्दारे स्वच्छता करण्यात आली.
तुर्भे विभागामध्ये सानपाडा येथील पुरातन दत्त मंदिराची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये भाविक नागरिक मोठया संख्येने सहभागी होते. सहा.आयुक्त भरत धांडे आणि स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या माध्यमातून या मोहीमेचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले. कोपरखैरणे विभागातही सहा.आयुक्त सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी राजुसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली पुरातन पावणेश्वर मंदिराची अंतर्गत व बाहय भागात सफाई करण्यात आली.
घणसोली विभागात तळवली गाव येथील करजूआई गावदेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. सहा.आयुक्त संजय तायडे व स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या पुढाकाराने ही मोहीम स्थानिक लोकसहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात आली. ऐरोली विभागामध्ये सहा.आयुक्त शंकर खाडे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली से-१७ येथील श्री दत्त मंदिर याठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आली.
दिघा विभागामध्येही कन्हैय्यानगर येथील श्रीअष्टभुजा दुर्गामाता मंदिर परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी झाली. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्याठिकाणी भाविक नागरिक श्रध्देने जातात अशी विविध धर्मांची प्रार्थनास्थळे स्वच्छ असावीत या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्तम सहभाग लाभला.
