‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत नवी मुंबईतील हॉटेल्स, जाहिरात व अभियांत्रिकी अशा आस्थापनांवर प्रशिक्षणासाठी नियुक्ती शिबिरास युवकांची हजेरी
नवी मुंबई, दि. २२: दि. १४ व २० ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिकेतील १९४ पदांकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ६ महिन्यांच्या कालावधीकरिता शिकाऊ उमेदवारांनी प्रशिक्षण देणेकामी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आज २२ ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल्स, जाहिरात व अभियांत्रिकी अशा खाजगी आस्थापनांवर शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणेकामी आयोजित शिबिरामध्ये १९ आस्थापनांनी आपली नोंदणी केली व त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी उपलब्ध जागांवर तशा प्रकारची शैक्षणिक अर्हता धारण करणा-या तीसहून अधिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यांना लवकरच संबंधित आस्थापनांकडून नियुक्ती देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील जास्तीत जास्त युवकांना कौशल्य विकासाची संधी मिळावी व या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी व्हावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आग्रही असून या योजनेच्या यशस्वीतेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल्स, हॉस्पिटल्स, मार्ट – बझार सारखी सेवा क्षेत्रे तसेच २० पेक्षा जास्त कर्मचारी असणा-या आस्थापना सहभागी व्हाव्यात यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने क्षेत्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरच त्यांचे आणखी एक शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
या अनुषंगाने नुकतीच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगसमुहांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या उद्योगांमध्ये युवकांना प्रशिक्षित करावे यादृष्टीने एमआयडीसीचे नवी मुंबई प्रादेशिक अधिकारी श्री. महेंद्र पटेल व औद्योगिक संघटनेच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेत चर्चा केली असून विविध उद्योगांमध्ये ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजना राबविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येत आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण’ योजनेंतर्गत ६ महिन्यांच्या कालावधीकरीता निवडण्यात येणा-या शिकाऊ उमेदवारांना शासनामार्फत प्रतिमहिना विद्यावेतन देण्यात येत आहे. यामध्ये – शैक्षणिक अर्हता १२ वी पास (HSC) : ₹ ६०००/- तसेच आय.टी.आय./पदविकाधारक : ₹ ८०००/- आणि पदवीधर / पदव्युत्तर पदवीधारक : ₹ १००००/- याप्रमाणे विद्यावेतन देण्यात येत आहे.
या योजनेकरिता उमेदवार किमान १८ व कमाल ३५ वर्ष वयाचा असावा. त्याची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/आय. टी. आय./पदविका/पदवी पदव्युत्तर असावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा तसेच त्याचे बँक खाते आधार संलग्न असावे. तसेच उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उदयोजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
त्याचप्रमाणे आस्थापना/उद्योगासाठीची पात्रताही सहजसोपी असून आस्थापना/उदयोग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा, आस्थापना/उदयोगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी, आस्थापना/उदयोगाची स्थापना किमान ३ वर्षापूर्वीची असावी. आस्थापना/उदयोगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उदयोग आधारची नोंदणी केलेली असावी. युवकांना महाविद्यालयीन शिक्षणानंतर आस्थापना/उद्योगांमध्ये आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करून देऊन त्यांचे भविष्य घडविणारी मुख्यमंत्री युवक कार्य प्रशिक्षण योजना असून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर युवक, युवतींनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
