संबंधित आरोग्य अधिकाऱ्यावर आयुक्त तात्काळ कारवाई करणार का?
नवी मुंबई, दि.२६: सध्याच्या कोविड काळात सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने लढतेय पण यात बऱ्याच वेळेला काही अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय. कोपर खैरणे, नवी मुंबई येथील नितीन(नाव बदलले आहे) या कोविड रुग्णाला नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा चांगलाच अनुभव येतोय. दिनांक २१ ऑक्टोबर रोजी हा रुग्ण कोविड पॉसिटीव्ह झाल्यावर त्याला वाशी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. प्रकृती स्थिर असल्याने या रुग्णाने आपल्याला होम क्वारंटाईन राहण्याबाबत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी येथील अधिकाऱ्यांनी नितीन यांना कोपर खैरणे येथील डॉ. देशपांडे नामक एका आरोग्य अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर (9833645335) देत सांगितले की याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार यांनाच आहे आपण त्यांना थेट संपर्क करावा. यानंतर या रुग्णाने डॉ. देशपांडे यांना बरेच कॉल केले शिवाय व्हाट्सएप द्वारे मेसेज केले तरी या अधिकाऱ्याने न फोन उचलण्याची तसदी घेतली मेसेजला उत्तर दिले.
दरम्यान नितीन यांना वाशी, सेक्टर-१४ येथील सिडको कम्युनिटी सेंटर मध्ये विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. नितीन यांच्याकडे राहत्या घराजवळच एक घर असून तेथे त्यांना एकटे राहणे शक्य आहे पण अधिकारी डॉ. देशपांडे हे कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचे दिसत नाही. कारण आमच्या कडे सदर तक्रार आल्यावर आम्हीही या डॉक्टर महाशयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला हाच अनुभव आला. एवढ्या महत्वाच्या पदावर काम करत असताना आपल्या कर्तव्याप्रती उदासीन असणे ही नक्कीच निषेधार्ह बाब आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणे लक्षणीय ठरेल. ते स्वतः या कोविड उच्चाटनाच्या मोहिमेत गांभिर्याने कर्तव्य पार पाडत असल्याचे दिसतेय. या जागतिक महामारीच्या काळात आपले कर्तव्य बजावताना जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या पालिका प्रशासनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा याचा त्रास कर भरणाऱ्या सामान्य जनतेलाच सोसावा लागेल.
