नवी मुंबई महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात कामगार प्रतिनिधींची बैठक संपन्न
नवी मुंबई, दि.७: आज गुरुवार दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी वाशी येथे ॲड. सुरेश ठाकुर यांच्या नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या कार्यकारिणी ने हिंद मजदूर सभा संलग्न मुंबई लेबर युनियनचे असिस्टंट सेक्रेटरी सुजित पाटील आणि ऑफिस सेक्रेटरी सदानंद प्रभु यांच्या उपस्थितीत युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांच्या निर्देशांनूसार नवी मुंबई महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या महत्वाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत पुढील मुद्यांवर चर्चा करण्यात आली:
१) कंत्राटी कामगारांना नवी मुंबई महानगर पालिकेत कायम करणे
२) समान काम समान वेतन २००७ पासूनच्या थकबाकीसह तंतोतंत मिळवणे
३) ३०० रुपये कोव्हिड भत्ता मिळवणे
४) पाणीपुरवठा विभागातील ७५ पंपऑपरेटर कामगारांची उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली काढणे
५) साफसफाई कामगारांसाठी कामाच्या ठिकाणीच सर्व सेवा सुविधायुक्त अद्ययावत हजेरी शेड तयार करणे
६) सर्व कंत्राटी कामगारांना त्यांच्या पदाप्रमाणे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल श्रेणीमध्ये सामावून घेणे आणि त्या त्या श्रेणी प्रमाणेच वेतन भत्ते लागू करणे.

सदर मिटिंग मध्ये नवी मुंबई महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांना त्यांचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यात ज्या-ज्या अडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी सखोल कायदेशीर अभ्यास करुन न्यायालयात दाद मागण्याचे सोबत इतर योग्य त्या मार्गाने प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन सुजित पाटील यांनी दिले असून गरज पडल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील जेष्ठ कामगार नेत्यांचे, जेष्ठ कामगार वकीलांचे सहकार्य घेण्यात येईल असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.
सदर बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे नरेंद्र वैराळ, विरचंद तांडेल, रविंद्र तांडेल, म्हशाळ आरोग्य विभागाचे यशवंत काळे, लाला अमृतसागर, अशोक आठवले तसेच साफसफाई विभागाचे गुरुनाथ बांगर, सुरेश सुपे ,कौसल्याताई चव्हाण इ. कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
