विधानसभा निवडणूकीच्या नवी मुंबईतील मतदान केंद्रांवरील सुविधा पूर्ततेकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आढावा बैठकीप्रसंगी निर्देश
नवी मुंबई, दि. १७: २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १५० ऐरोली व १५१ बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील १७६ ठिकाणी असलेल्या ८३१ मतदान केंद्रांवर मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे याकरिता आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जातील याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आश्वासित किमान सुविधा (AMF) पूर्ततेबाबत विशेष बैठक घेत सर्व संबंधित अधिका-यांना दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष व दृकश्राव्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघात ७९ ठिकाणी ४४७ मतदान केंद्रे व १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघात ९७ ठिकाणी ३८४ मतदान केंद्रे असून १५० ऐरोली मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाने तसेच १५१ बेलापूर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम.अश्विनी पाटील यांच्या नियंत्रणाखाली सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. यामध्ये महानगरपालिकाही संपूर्ण सहकार्य करीत असून निवडणूक विभागामार्फत महानगरपालिकेच्या अधिका-यांकडे सोपविलेल्या निवडणूकविषयक कामाच्या विविध जबाबदा-या नियोजनबध्द रितीने पार पाडल्या जात आहेत.
या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून एनएमएमटी बसेस व बसस्टॉपवर बॅनरद्वारे मतदानाकरिता आवाहन करण्यात आले आहे तसेच ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग, सेल्फी स्टँड, स्वाक्षरी फलक लावण्यात आले आहेत. एनएमएमटी बसेस, कचरा वाहतुकीच्या घंटागाड्या, नाट्यगृह येथे जनजागृतीपर ध्वनिफिती प्रसारित करण्यात आल्या आहेत तसेच चित्रपटगृहांमध्ये व्हिडिओ क्लिप्स प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सोशल मिडीया हॅंडल्सवरून ग्राफिक्स तसेच मान्यवर कलावंतांच्या व्हिडिओ क्लिप्स प्रसारित करण्यात येत आहेत. यासोबतच पथनाट्य, फ्लॅश मॉब, मॅस्काॅट, सायकलवरून जनजागृती असे वेगळे उपक्रमही राबविले जात आहेत.
याकामी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेत निबंध, वक्तृत्व, चित्रकला, पोस्टर्स, रांगोळी, पथनाट्य, शाळेच्या परिसरात जनजागृतीपर रॅली असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात मतदानाचे महत्व ठसविले जात आहे तसेच त्यांच्या माध्यमातून मतदान करण्याचा संदेश दिला जात आहे. याशिवाय पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम राबवित विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचा आग्रही संदेश देण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. युवकांनाही आकर्षित करणारे उपक्रम राबविण्यात आले. अशा विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यात महत्वाचे म्हणजे नागरिकांना त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्र याची माहिती मतदानापूर्वी २-३ दिवस आधीच समजावी यादृष्टीने बीएलओ मार्फत घराघरापर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहचविल्या जात आहेत, माहितीपत्रकाव्दारे मतदान केंद्राचा क्यू आर कोड घरोघरी पोहोचविला जात आहे. सोसायट्यांमध्येही दर्शनी भागात क्यू आर कोड प्रसिध्द केले जात आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर देखील कोणत्या खोलीत कोणत्या क्रमांकाचे मतदान आहे त्याची मतदार क्रमांकानुसार यादी दर्शनी भागात फलकावर प्रसिध्द केली जाणार आहे. अशा सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष देत त्याची पूर्तता होईल याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले आहे.
यासोबतच मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे स्वच्छ व शुध्द बाटलीबंद पाणी याची उपलब्धता करून देणे, स्वच्छतागृहांची मतदान दिनांकापूर्वी १८ व १९ तारखांना सखोल स्वच्छता करणे, मतदान केंद्रांवरील मतदार संख्या लक्षात घेऊन तेथे आवश्यक तेवढी मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, केंद्रांची अंतर्गत व परिसर स्वच्छता करणे, लाईट व पंखे यांची व्यवस्था करणे, सावलीसाठी मंडप तसेच बैठक व्यवस्थेकडे लक्ष देणे, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता रॅम्प आणि व्हिलचेअर व्यवस्था याची खातरजमा करून घेणे, मतदान केंद्र परिसरात पार्कींग व्यवस्था ठेवणे व त्याचे फलक प्रदर्शित करणे, मतदान केंद्रांवरील रांगांच्या व्यवस्थापनासाठी १८ वर्षाखालील एनसीसी/एनएसएस विद्यार्थ्यांचे समुह ठेवणे, मतदान केंद्रांवर मार्गदर्शन करणा-या बीएलओ यांची दर्शनी जागी बैठक व्यवस्था करणे अशा विविध बाबींकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.
यापूर्वी मतदान केंद्रांच्या काही जागांची आयुक्तांनी पाहणी केली असून बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने निवडणूकीपूर्वी पुन्हा पाहणी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मतदान केंद्रांवर येणा-या मतदारांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकडे आयुक्त बारकाईने लक्ष देत आहेत. तरी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदार संघातील सर्व मतदारांनी आपले हक्काचे मत वाया जाऊ न देता २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत नक्की मतदान करावे आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
