शहर स्वच्छतेवर लक्ष देतानाच प्रत्येक घरापासूनच कचरा वर्गीकरण होण्यासाठी अधिक काटेकोर काम करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई, दि. ३: नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे नागरी सेवा – सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करीत असून गुणवत्तापूर्ण व गतीमान कामकाजावर भर देत आहेत. सकाळी ६ वाजताच आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अचानक केली स्वच्छता कामकाजाची पाहणी स्वच्छता ही नवी मुंबई शहराची ओळख असून शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सकाळी 6 वाजता बेलापूर क्षेत्राला भेट देत स्वच्छता कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. शहरात सकाळी ६ वाजता साफसफाईचे काम सुरु होऊन सकाळी ६.३० वाजल्यापासून कचरा संकलनाचे काम सुरु झाले पाहिजे असे निर्देश यापूर्वीच आयुक्तांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी चालणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ च्या विशेष आढावा बैठकीत दिेले.
घरातूनच ओला, सुका व घरगुती घातक अशाप्रकारे दैनंदिन कचरा वर्गीकरणावर भर
स्वच्छता ही नियमीत करण्याची गोष्ट असल्याने कचऱ्याचे ओला, सुका व घरगुती घातक असे तीन प्रकारे घरातूनच दररोज वर्गीकरण केले जाणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत नागरिकांना ही दैनंदिन सवय लागावी याकरिता सातत्याने जनजागृती करीत राहणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याकरिता कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता मित्रांपासून ते विभागप्रमुखांपर्यंत घनकचरा व्यवस्थापनासह इतर सगळयाच विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी ही आपली सामाजिक जबाबदारी समजून जनजागृतीचे काम करावे असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मोठया सोसायटयांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून विल्हेवाट लावली जाणे अनिवार्य असून हे प्रकल्प नियमीत कार्यान्वित राहतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
निर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आल्यास घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागणार नाही तसेच मोठया सोसायटयांमध्ये कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प राबविल्याने तेथील कचऱ्याचे संकलन व वाहतूक करावी लागणार नाही. या दोन्ही गोष्टींमुळे श्रम व मूल्यांमध्ये लक्षणीय बचत होईल हे लक्षात घेऊन याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कचरा संकलन व वाहतुकीचे होणार विभागनिहाय सूक्ष्म नियोजन कचरा संकलन आणि त्याची वाहतूक यांच्या वेळा निश्चित करून त्याचे विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करावे आणि आठवडयाभरात सर्व विभागांचा क्षेत्रनिहाय नियोजन आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
वर्दळीच्या व वाणीज्य भागात सकाळी आणि रात्री दोन वेळा साफसफाई केली जात असून याकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. त्यादृष्टीने रात्री उशीरापर्यंत वर्दळ असते असे बसस्टॉप, रेल्वे स्थानक परिसर, बाजाराची काही ठिकाणे येथे अधिक काळजीपूर्वक स्वच्छता करण्याचे सूचित करण्यात आले.
शौचालये सुस्थितीसाठी विशेष मोहीम व सुयोग्य देखभालीचे नियोजन शहरातील यलो स्पॉट व रेड स्पॉट यांची पुन्हा एकवार शोधक पाहणी करावी व त्याठिकाणी अस्वच्छता होणार नाही यादृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी आठही विभागांना दिले. सार्वजनिक व सामुदायिक शौचालये यांची स्थिती उत्तमच असली पाहिजे हा कटाक्ष ठेवून सर्वच शौचालयांची बारकाईने पाहणी करावी व आवश्यक त्या दुरुस्ती तातडीने करुन घ्याव्यात व त्याची देखभाल नियमीतपणे योग्य प्रकारे होत राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशित करण्यात आले. ज्या ठिकाणी यलो स्पॉट आहेत अशा विशेषत्वाने बाहेरगावी जाणाऱ्या बसेसचे थांबे, रिक्षा, टॅक्सी स्टँड, मार्केट ठिकाणी युरिनल उपलब्ध करुन दयावेत.
शालेय स्वच्छतेवर विशेष भर
शालेय स्वच्छता हा यापूर्वी स्वच्छता अभियानातील स्वतंत्र असणारा घटक यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आलेला असून त्यादृष्टीने शाळांचे वर्ग आणि परिसराची नियमित स्वच्छता राखण्याकडे विशेष लक्ष देणे, दोन कचरापेटया ठेवणे, घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीची स्वतंत्र व्यवस्था करणे, कंपोस्ट पिट्स कार्यान्वित ठेवणे त्यासोबतच शाळांमधील शौचालयांची स्थिती चांगली राहील या गोष्टींची प्राधान्याने काळजी घेण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. यापूर्वी आयुक्तांनी शिरवणे शाळेच्या पाहणी दौऱ्यानंतर नमुंमपातील अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय भेटीप्रसंगी त्या भागातील शाळांना भेटी दयाव्यात व तेथील सेवा – सुविधा व स्वच्छतेची पाहणी करावी असे सूचित केले होते. या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांनी पुन्हा निर्देशित केले. आजचे शालेय विद्यार्थी हेच उद्याचे सुजाण नागरिक असल्याने त्यांच्या मनावर लहानपणापासूनच स्वच्छतेचा संस्कार शाळांतून व्हावा यादृष्टीने याकडे अधिक लक्ष देण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर थांबण्यासाठी सातत्यपूर्ण कारवायांवर भर
पर्यावरणाला घातक असणाऱ्या एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधाकडे अधिक काटेकोरपणे बघण्याची गरज विशद करत आयुक्तांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबावा यादृष्टीने प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया अधिक प्रभावीपणे राबवाव्यात व त्यात सातत्य ठेवावे असे निर्देश दिले.
वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष
वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या असून त्यादृष्टीने ठोस उपाययोजना करताना धूळ प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असल्याची नियमीतपणे खात्री करावी तसेच बांधकाम साहित्य वा तोडकामाचा घनकचरा वाहून नेताना तो रस्त्यावर पडून होणाऱ्या प्रदूषणाला संबंधित बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी निश्चित करावी व तो साफ न केल्यास संबंधितांवर ठोस कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे वॉटर फॉगिंग तसेच दर आठवडयाला डिप क्लिनींगवर भर दयावा असेही निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे शहराचे पर्यावरण राखण्यासाठी आवश्यक उपाय करताना फळे-फुले देणा-या देशी प्रजातींच्या वृक्षरोपणावर प्राधान्याने भर तसेच वाहतुक बेटांमध्ये अथवा मोकळ्या जागांमध्ये बांबुची लागवड करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
शहर सुशोभिकरणात नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याकडे लक्ष
शहर स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देताना आयुक्तांनी सार्वजनिक जागी काढलेल्या भित्तीचित्रांचे आवश्यक त्या ठिकाणी पुनर्रंगकाम करावे, शिल्पाकृतींची दुरुस्ती करावी तसेच काही व्हर्टिकल गार्डन्सच्या ठिकाणी आर्किटेक्चर महाविदयालयाच्या विदयार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन त्यातील उत्तम संकल्पना राबवाव्यात असे सूचित केले.
स्वच्छतेचे अभिनव उपक्रम अधिक कृतीशील करून त्यांची व्याप्तीवाढ
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत थ्री आर सेंटर्स, थ्री आर ऑन व्हिल्स, फिशफेड, ड्रायवेस्ट बँक, प्लास्टिमॅन, ग्रीनसोल असे विविध उपक्रम राबविले जात असून ते अधिक चांगल्या पध्दतीने कार्यान्वित राहण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे झिरो वेस्ट स्लम मॉडेलची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.
स्वच्छता कार्यात नागरिकांच्या कृतीशील सहभागासाठी विशेष प्रयत्न
स्वच्छता कार्यात संपूर्ण यश मिळण्यासाठी नागरिकांचे संपूर्ण सहकार्य अत्यंत महत्वाचे असून हे माझे शहर आहे व माझे शहर स्वच्छ राखण्यात मी १०० % योगदान देईन ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात कायमस्वरूपी रुजविण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंस्फुर्तीने काम करावे असे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिेंदे यांनी सूचित केले.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ अंतर्गत कामांवर विभागनिहाय नोडल अधिकारी यांचे राहणार बारीक लक्ष
यावेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये करावयाच्या कामांबाबतचा कृती आराखडा सादरीकरणाव्दारे उपस्थितांसमोर मुद्देनिहाय मांडण्यात आला व प्रत्येक विभागाची या कामांमधील जबाबदारी स्पष्ट करण्यात आली. स्वच्छतेविषयीच्या प्रत्येक बाबींवर सर्वेक्षणातील मुद्दयांच्या अनुषंगाने निरीक्षण करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार आठही विभागांकरिता विभागप्रमुख दर्जाच्या आठ नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत स्वच्छता कामांचे महानगरपालिका स्तरावर परीक्षण केले जाणार आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त शिरिष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा अभियाना’ची सामुहिक शपथ घेतली.
