डॉ. डि. वाय. पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर यांनी बजावली महत्वाची भूमिका
नवी मुंबई, दि. ७: मिशन इनोव्हेशन प्रोग्रामव्दारे विदयार्थ्यांच्या कल्पकतेला नवी दिशा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील १६ शाळांमध्ये जाऊन ५०० हून अधिक विदयार्थ्यांना इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ट्रेनिंग देण्यात आलेले आहे. यामध्ये डॉ. डि. वाय. पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर यांनी महत्वाची भूमिका बजावलेली असून याकामी प्रा. आशिष जाधव आणि त्यांचे सहकारी यांच्यामार्फत पुढाकार घेण्यात आलेला आहे.
यामध्ये मुलांच्या विज्ञानविषयक आवडीला योग्य दिशा देऊन त्यांच्यातील विज्ञान व तंत्रज्ञान याबाबतच्या विविध संकल्पनांना मुक्त वाव देण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याचप्रमाणे विदयार्थ्यांमधील कौशल्याचा उपयोग करुन उपलब्ध संसाधनांमध्ये प्रकल्प निर्मिती करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाकरीता ग्रॉक लर्निंग प्रा. लि. यांच्यामार्फत एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स यावर आधारित शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात एमबीएस हायस्कुल ईश्वर नगर दिघा (२० विदयार्थी), आदर्श हिंदी विदयालय दिघा (२० विदयार्थी), साईनाथ हिंदी प्रायमरी विदयालय वाशी (१२० विदयार्थी), तेरणा प्राथमिक विदयालय नेरुळ (१८ विदयार्थी), तेरणा माध्यमिक विदयालय नेरुळ (३५ विदयार्थी), शिरवणे विदयालय से-२ नेरुळ (४० विदयार्थी), नवी मुंबई विदयालय कोपरी (२० विदयार्थी), अंजुमन इस्लाम प्राथमिक उर्दू स्कुल तुर्भे (४९ विदयार्थी), आयसीएल मोनामी स्कुल तुर्भे (१८ विदयार्थी), नुतन मराठी विदयालय से-१९ नेरुळ (३० विदयार्थी), डॉ. एस.व्ही.सामंत हायस्कुल तुर्भे (२० विदयार्थी), हिेंदमाता विदयालय दिघा (२० विदयार्थी), श्रीराम विदयालय ऐरोली (२० विदयार्थी), शिक्षक प्रशिक्षक विदयालय नेरुळ (५७ विदयार्थी), गोल्ड क्रेस्ट हायस्कुल वाशी (२५ विदयार्थी), आयसीएल हायस्कुल वाशी (३० विदयार्थी) अशा प्रकारे एकूण ५४२ विदयार्थ्यांनी इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ट्रेनिंगचा लाभ घेतला.

शाळा शाळांमध्ये जाऊन विदयार्थ्यांना प्रशिक्षण देण्यापूर्वी विविध शाळांमधील २०० हून अधिक विज्ञान शिक्षकांना डॉ. डि. वाय. पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने भविष्यातील प्रगतीचा वेध घेऊन आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सवर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. डि. वाय. पाटील इंजिनिअरींग कॉलेजच्या ३० विदयार्थ्यांना प्रशिक्षित करुन मेंटॉर बनविण्यात आले होते.
शाळांमध्ये प्रशिक्षण देताना प्रशिक्षणाची चार सत्रे करण्यात आली. यामधील पहिल्या सत्रात डॉ. डि. वाय. पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरच्या प्राध्यापकांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतरच्या तीन सत्रात मेंटॉर विदयार्थ्यांनी प्रशिक्षण सत्रे घेतली. आपल्यापेक्षा वयाने थोडेसे मोठे असलेले विदयार्थीच आपल्याला प्रशिक्षण देत आहेत ही बाब शाळांमधील विदयार्थ्यांना नवी प्रेरणा देणारी ठरली. त्यामुळे शाळांमधील विदयार्थी प्रशिक्षणाशी एकाग्रतेने जोडले गेले.
विदयार्थी प्रशिक्षणानंतर नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने डॉ.डि.वाय.पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर आणि ग्रॉक लर्निंग यांच्या सहयोगातून विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांकरीता ‘स्वच्छ इनोव्हेशन टेक्नोलॅाजी स्पर्धा’ आयोजित करणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली आहे. यापुढील काळात आणखी शालेय विदयार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या जाणीवा उंचावण्यासाठी इनोव्हेटिव्ह प्रोग्राम ट्रेनिंग उपक्रमाचे आयोजन केले जाणार असून या विदयार्थ्यांमधील कौशल्याचा उपयोग नवी मुंबईच्या प्रगतीशील वाटचालीत होणार आहे.
