सायन पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची आता नवी मुंबई महानगरपालिका घेणार काळजी
नवी मुंबई: स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील १० ते ४० लक्ष लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई नावाजली जात असताना शहर स्वच्छता आणि सुशोभिकरणाकडे नवी मुंबई महापालिकेकडून अत्यंत काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे.
यामध्ये सायन पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापि या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने नवी मुंबई महानगरपालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते.
याकरिता सायन – पनवेल महामार्गावर नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विद्युत पथदीप दुरुस्ती व देखभालीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावेत अशी मागणी महानगरपालिकेमार्फत सातत्याने केली जात होती. याबाबत महापालिका व शासन स्तरावर वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या.
याबाबत अंतिम निर्णय झाला असून वाशी टोलनाका ते कोकण भवन या सायन-पनवेल रस्त्यावरील सर्व पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, विदयुत यंत्रणा व विदुयत मीटर नवी मुंबई महानगरपालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विदयुत विभागाकडून हस्तांतरित करण्यात येत असलेले पत्र महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांस देण्यात आलेले आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील एक महत्वाची सुविधा म्हणजे त्यावरील पथदिवे अनेकदा बंद असल्याने वाहन चालकांची व नागरिकांची गैरसोय होत होती. हा महामार्ग महानगरपालिकेच्या हद्दीतून जात असला तरी महानगरपालिकेच्या अखत्यारित नाही याविषयी नागरिकांना माहिती नसल्याने नवी मुंबई महानगरपालिकेला दोष दिला जात होता. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाशी टोलनाका ते कोकण भवन या भागातील सर्व पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावेत याविषयी महानगरपालिका आग्रही भूमिका मांडत होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी दोन्ही प्राधिकरणाच्या बैठकाही घेण्यात येत होत्या..
याबाबत १५ सप्टेंबर २०२१ रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे या पथदिव्यांची दोन्ही प्राधिकरणांमार्फत संयुक्त पाहणी करण्यात आली.
त्यानुसार वाशी टोलनाका ते कोकण भवन या सायन-पनवेल रस्त्यावरील सर्व पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, विदयुत यंत्रणा व विदुयत मीटर नवी मुंबई महानगरपालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विदयुत विभागाकडून हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत. पथदिवे हस्तांतरीत करण्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीकरिता लागणाऱ्या अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक महानगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागास देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागामार्फत याबाबतची पडताळणी करण्यात येऊन रु. ८ कोटी २९ लक्ष इतकी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावरील पादचारी भुयारी मार्ग, नेरुळ येथील दोन पादचारी भुयारी मार्ग व एसबीआय कॉलनी येथील भुयारी मार्ग असे एकूण ४ पादचारी भुयारी मार्ग हे देखभाल व दुरुस्तीकरीता नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सायन-पनवेल महामार्गावरील पथदिव्यांचा प्रश्न सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना गुणवत्तापूर्ण सुविधा पुरविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून महानगरपालिकेच्या वतीने सायन – पनवेल महामार्ग नियमीत प्रकाशमान राहील याची संपूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासित केले आहे.
