जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जनजागृतीपर रॅलीचे आयोजन
नवी मुंबई, दि. ८: नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना सामावून घेणारे देशातील एकमेव आणि नावलौकिक प्राप्त केंद्र आहे. त्यांच्यामार्फत दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ३ डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे हा उद्देश साकारण्यासाठी संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्याप्रमाणे दिव्यांग मुलांचे पालक व त्यांच्याशी संबंधित काम करणा-या संस्था, व्यक्ती यांचाही सहभाग असणार आहे.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून ४ डिसेंबर रोजी दिव्यांगात्वाबाबत जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. यामध्ये नमुंमपा ईटीसी केंद्रातील विविध प्रवर्गातील दिव्यांग मुले व त्यांचे पालक आणि ईटीसी शिक्षक व कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभाग झाले होते. रॅलीचा प्रारंभ सकाळी ९ वाजता ईटीसी केंद्र येथून झाला व वाशी गावामध्ये पूर्ण फेरी मारून घालून या रॅलीची ईटीसी केंद्रामध्ये सकाळी ११ वाजता सांगता करण्यात आली. अशाचप्रकारे या संपूर्ण महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
