व्यवसाय परवाना नुतनीकरण करणेबाबात नवी मुंबई मनपाचे जाहीर आवाहन
नवी मुंबई, दि. २: नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३७६, अनुसूची “ड”, प्रकरण १८, भाग ४ मध्ये समाविष्ट असलेले खानावळी, हॉटेल, उपहारगृहे, लॉजिंग बोडींग, स्वीट मार्ट, केक शॉप, आईस्क्रिम पार्लर, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर इत्यादी सर्व व्यवसाय यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३७६ अन्वये देण्यात आलेल्या व्यवसाय परवान्यांचे नुतनीकरण दरवर्षी करण्यात येते.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत त्यांचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया तसेच व्यावसायिकांना परवाना देण्याची प्रणाली पारदर्शी व सुलभ करण्याकरिता तसेच विनासायास गतीमानतेने होण्याकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या अनुषंगाने ज्या व्यावसायिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडून कलम ३७६ अन्वये व्यवसाय परवाना घेतलेला आहे आणि ज्या व्यवसायिकांनी घेतलेल्या व्यवसाय परवान्याची कालमर्यादा संपुष्टात आलेली आहे, अशा सर्व व्यवसायिकांनी व्यवसाय परवाना नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
“व्यवसाय परवाना नुतनीकरण २०२४” साठी संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह www.rtsnmmconline.com किंवा नमुंमपाचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in वरील सुविधेचा वापर करून ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज स्वतः सादर करावेत. विहित कालमर्यादेत परवान्याचे नुतनीकरण केले नाही तर परवाना धारकास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३९२, ४६८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. व्यवसाय परवाना नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३७६ अनुसार ऑनलाईन पध्दतीनेच परवाना नुतनीकरणाची कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकांनी त्वरित परवाना नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
