नमुंमपाच्या आयुष्मान भव आरोग्य मेळाव्यात ३१३७ व्यक्तींची झाली आरोग्य तपासणी
नवी मुंबई, दि. ४: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते आयुष्मान भव मोहीमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही मोहीम दि. १७ सप्टेंबर ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहीमेअंतर्गत विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात येत असून दर शनिवारी आयुष्मान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनेही नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान भव आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार याविषयी नमुंमपाची रुग्णालये व ना.प्रा.आ. केंद्र स्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यामध्ये सफाई मित्र, क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची, मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी अंतर्गत एक्सरे तपासणी, रक्तदाब, Blood Sugar, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचा-यांमार्फत तपासणी शिबिर आयोजित करुन बांधकाम मजुरांची तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य मेळाव्यामध्ये सुमारे ३१३७ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरांवर आभा कार्डची निर्मिती व अवयव दानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजीच्या आरोग्य मेळाव्यास नागरिकांचा मोठया प्रमाणावर उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शनिवार दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या आरोग्य मेळाव्यामध्ये सर्व गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दर शनिवारी आयोजित करण्यात येणा-या आयुष्मान आरोग्य मेळाव्यास नागरिकांनी असाच मोठया संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त रोजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
