नवी मुंबईतील नव्याने सुरू झालेल्या कोविड सेंटर मधील स्वच्छतागृहांना अस्वच्छतेचे ग्रहण
नवी मुंबई: नुकेतच नवी मुंबईतील वाशी स्थित सिडको प्रदर्शन केंद्रात १२०० बेडस क्षमतेचे कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र जरी सर्व सोयी-सुविधांनी युक्त असले तरी येथील स्वछता व्यवस्थेचे बारा वाजलेले पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र वार्ताकडे थोड्याच वेळापूर्वी येथील स्वच्छतागृहांबाबत तक्रारी व फोटो आलेले आहेत.
या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतेय की इथे संडास अस्वच्छ आहेत. याच सोबत वॉश बेसिन मध्येही रुग्णांनी केलेल्या उलट्या स्वच्छ केलेल्या दिसत नाहीत. या संदर्भात आम्हाला आलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, “नव्याने स्थापन झालेल्या या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची खूप गैरसोय होत असल्याने ते पुन्हा आजारी पडण्याची दाट शक्यता आहे. येथे असणारे स्वच्छतागृह हे अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. प्रचंड घाणेरडे असल्याने तेथे कोणीही जाऊ शकत नाही आणि त्यामुळे गेले दोन दिवस विना अंघोळ करता रुग्ण तेथे थांबले आहेत. यासाठी वारंवार तक्रार करून देखील त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. या गोष्टीची दखल घेण्यासाठी देखील तेथे कोणी अधिकारी किंवा डॉक्टर पुढे येत नाही.”
या तक्रारदाराने पुढे असे म्हटले आहे की, “अशी अवस्था जर पुढे राहिली तर उद्या कोविड सोबत इथे राहिलेले रुग्ण हे आणखी दुसरा संसर्गजन्य आजार घेऊन घरी जातील आणि त्यासोबत उद्या तो आजार पसरल्या शिवाय राहणार नाही. ही सर्व परिस्थिती गंभीर आहे आणि याची दखल ही त्वरित घ्यायला हवी.”

हे कोविड सेंटर सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असे आहे. याशिवाय येथे ५०० ऑक्सिजन बेड्स ची व्यवस्थाही करण्यात आली आहे. परंतु मूलभूत अशा स्वच्छतेच्या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे. यात जर कंत्राटदाराची चूक असेल तर त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
एक विशेष बाब म्हणजे या कोविड सेंटर ला गेल्याच आठवड्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसळ यांच्यासमवेत भेट दिली होती. पण ही दृश्य पाहून असे जाणवते की येथे मूलभूत अशा स्वच्छता व्यवस्थेची बोंब आहे. राज्याचे आरोग्यमंत्री याबाबत काय कारवाई करतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.
