यंग सायंटिस्ट इंडिया राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील सर्वेश तळेकर व सोम महाजन या दोन विद्यार्थ्यांनी उमटवली देश पातळीवर यशाची नाममुद्रा
नवी मुंबई, दि. २६: ‘स्पेस किड्स इंडिया’ या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत आयोजित ‘यंग सायंटिस्ट इंडिया’ या स्पर्धात्मक विज्ञान प्रदर्शन उपक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांचे १८ हजारपेक्षा अधिक विज्ञान प्रकल्प सादर झाले होते. त्यामधून नमुंमपा शाळा क्र. ३१ चा विद्यार्थी सर्वेश दयानंद तळेकर तसेच नमुंमपा शाळा क्र. ४९ चा विद्यार्थी सोम कैलास महाजन या दोन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड टॉप टेन प्रकल्पांमध्ये झालेली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या विद्यार्थ्यांसह सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या प्रदर्शनात्मक स्पर्धेमध्ये सहभागी १८ हजारहून अधिक विज्ञान प्रकल्पांमधून १४० प्रकल्पांची निवड करण्यात आली व त्यामधील टॉप २० प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. चेन्नई येथे पार पडलेल्या अंतिम फेरीतून निवडलेल्या टॉप २० प्रकल्पांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील १२ प्रकल्पांचा समावेश होता. यामध्ये नमुंमपा शाळा क्र. ३१ मधील विद्यार्थी यश प्रकाश निकम आणि सर्वेश दयानंद तळेकर, नमुंमपा शाळा क्र. ४२ मधील विद्यार्थी प्राजक्ता दिपक घोरपडे, विद्या शशिकांत रामगिरे, वैदेही प्रदिप नावळे व अक्षरा तुकाराम सावंत, नमुंमपा शाळा क्र. ७६ मधील विद्यार्थी अभिषेक जयप्रकाश साह व पवन दुर्गेश यादव, नमुंमपा शाळा क्र. ४९ मधील विद्यार्थी सोम कैलास महाजन, वृषाली प्रविण मुथेवार आणि लक्ष्मी लिंगप्पा पुजारी, तसेच नमुंमपा शाळा क्र. ४७ मधील विद्यार्थिनी साक्षी शंकर घावळे अशा १२ विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची निवड टॉप २० मध्ये झाली.
या २० प्रकल्पांच्या महाअंतिम फेरीतून १० प्रकल्पांची निवड करण्यात आली असून या टॉप टेन विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना सन्मानचिन्ह, पारितोषिकासह ‘यंग सायंटिस्ट इंडिया’ विशेष मेडल सन्मानचिन्ह प्रदान करून चेन्नई येथे गौरविण्यात आलेले आहे. या टॉप टेनमध्ये नमुंमपा शाळा क्र. ३१, येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी सर्वेश दयानंद तळेकर तसेच नमुंमपा शाळा क्र. ४९ येथे शिकणारा विद्यार्थी सोम कैलास महाजन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर संपादन केलेल्या या यशामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करणा-या शिक्षण पध्दतीचा गौरव झाला असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिक्षण विभाग उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी अरूणा यादव यांनी या दोन विद्यार्थ्यांसह अंतिम फेरीत निवड झालेले १२ विद्यार्थी तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणा-या नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील ‘शिक्षण व्हिजन’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असून त्यांना महापालिका शाळांतील शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन लाभत आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस या संस्थांच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते. या यशामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले असून टॉप टेन मध्ये निवड झालेले यंग साईंन्टिस्ट इंडिया किताब प्राप्त सर्वेश तळेकर व सोम महाजन या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
