दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा
नवी मुंबई, दि. २१: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्यासमवेत उपस्थित समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहा. आरोग्य अधिकारी रत्नप्रभा चव्हाण, लेखाधिकारी मारोती राठोड, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली. यावेळी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
“आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत” अशी प्रतिज्ञा घेत महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाने “आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित आणि मूल्य धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू” असा दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञेचा मजकूर सर्वांनी सामुहिकरित्या म्हटला.
