आर.टी.ई. २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन २०२४-२५ बाबत नवी मुंबई महापालिकेतर्फे आवाहन
नवी मुंबई, दि. १७: सन 2024-25 या आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी यापूर्वी दि. 17 एप्रिल ते 10 मे 2024 पर्यंत बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.
त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे सन 2024-25 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वयं अर्थसहाय्यित शाळा) या शाळांमध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 98 पात्र शाळा आहेत.
RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/…/Users/rte_index_new या वेबसाईटवर दि. 17 ते 31 मे 2024 पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादींबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदर प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट – SC/ST/NT/VJ/OBC/SBC, दुर्बल गट – एक लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग – बालकाचे 40% अपंगत्व, एच.आय.व्ही.बाधित किंवा एच.आय.व्ही प्रभावित बालके, अनाथ बालके) जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रक्रियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घेण्यात यावी.
यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा सन 2024-25 या वर्षाच्या आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग (प्राथमिक) यांचेकडून करण्यात येत आहे .
