दर बुधवार-गुरुवारी शिवसेना भवनात नितीन नांदगावकर स्वीकारणार लुटारू रुग्णालयां संदर्भातील तक्रारी
मुंबई दि.२१: गेल्या चार महिन्यांत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना इस्पितळात भरती व्हावं लागलं व अद्यापही हे चक्र चालूच आहेत. याकाळात जे सरकारी रुग्णालयांत गेले त्यांचे उपचार मोफत झाले पण पुरेशा खाटांअभावी अनेकांना खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागली.
गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन म्हणवले जाणारे नितीन नांदगावकर यांनी रुग्णांना वारेमाप बिल आकारून लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांविरुद्ध मोर्चा उभारला आहे. या काळात त्यांनी नानावटी, हिरानंदानी सारख्या पंचतारांकित व्यवस्था असणाऱ्या सुपर स्पेशीएलिटी रुग्णालयांना तर त्यांनी गुढगे टेकवायला लावले. या नंतर नांदगावकरांकडे चोही बाजूने खाजगी रुग्णालयांच्या तक्रारी यायला लागल्या. रुग्णांची लूटमार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांना कायदेशीररित्या दणका देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून व्यापक मोहीम सुरू करत असल्याचे नितीन नांदगावकर यांनी आज शिवसेना भवन दादर येथे जाहीर केले. आता दर बुधवारी व गुरुवारी दुपारी १२ ते २ दरम्यान नांदगावकर लोकांच्या रूग्णालय व औषधांसंबंधीत तक्रारी स्वीकारणार आहेत.
या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “नागरिकांना खाजगी हॉस्पिटलकडून बिलाच्या बाबतीत किंवा रुग्णाला देण्यात येणाऱ्या औषधांबाबत काही समस्या, तक्रारी असतील तर त्या विषयीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे एक लेखी निवेदन व संबंधित पुरावे जमा करावे. ही निवेदनं दर बुधवारी व गुरुवारी दुपारी १२ ते २ दरम्यान शिवसेना भवना खाली स्वीकारणार असून आलेल्या तक्रारिंची-निवेदनांची योग्य पडताळणी करून जी निवेदनं पात्र असतील तीच फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविली जाणार आहेत.
याविषयी पुढे बोलताना नांदगावकरांनी लोकांसाठी एक विशेष विनंती केली की, “सध्या आपण फक्त रुग्णालय व औषधांसंबंधी तक्रारीच स्वीकारणार असून दुसरे कोणतेही विषय स्वीकारले जाणार नाहीत.”
