केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, दि. १४ : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दि. १४ रोजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीन केंद्रीय प्रसार ब्युरो-सीबीसी महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय आणि नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव छायाचित्र प्रदर्शनाचे फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून उदघाटन केले. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचएआय यांच्या संयुक्त विद्यमाने सिताबर्डी येथील मेट्रो जंक्शन येथे आजादी का अमृत महोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून १६ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना निशुल्कः पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी राजेश अग्रवाल, नागपूरच्या सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सीबीसी पुणेचे उपसंचालक निखील देशमुख, पत्र सूचना कार्यालय नागपूरचे उपसंचालक शशीन राय, नागपूर सीबीसी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रचार अधिकारी हंसराज राऊत यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी गडकरींनी छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली आणि स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य विराची तसेच स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घटनांची माहिती जाणून घेतली. गडकरी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचा त्यांनी याप्रसंगी अभिप्राय पुस्तिकेत नोंदविला. याच प्रदर्शनीमध्ये नागपूर आणि विदर्भात सुरू असलेल्या एनएचआयच्या विकास कामांच्या छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी त्यांनी केली. केंद्रीय प्रसार ब्युरो-सीबीसी महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय पुणेच्या कलावंतानी देशभक्तीपर गीत गायनाचे सादरीकरणही यावेळी केले.
या चार दिवसीय प्रदर्शनात नागपूर महानगर पालिकेतर्फे कोवीड लसीकरण वर्धक मात्रा देण्याचा स्टॉल लावण्यात आला आहे .सन १७०० पासून ते १९४७ पर्यन्तचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व महापुरूषांची माहिती, स्वातंत्र्य नंतरचा भारत एकसंघ करण्यासाठी केलेले प्रयत्न, भारताचा संविधान, स्वतंत्रता आंदोलनातील प्रमुख स्थळ, अशी विविध प्रकारची माहिती सांगणारे हे भव्य छायाचित्र प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन नागरीकांसाठी निःशुल्क असून नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.
**
