केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर, दि. २: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्ली-मुंबई, ढोलेरा-अहमदाबाद तसेच इतर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमध्ये कचऱ्याचे विलगीकरण करून कंत्राटदारांना या कचरा सामग्रीचे रस्ते बांधणीत वापर करण्याचे सांगितले असून आतापर्यंत 80 लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला आहे. यामुळे पर्यायाने कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज २ ऑक्टोबर रोजी नागपूर महानगरपालिकेद्वारे वारसास्थळ असलेल्या कस्तुरचंद पार्क येथे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आतिरिक्त आयुक्त आँचल गोयल उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका ही सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी, वीज निर्मिती करिता औष्णिक प्रकल्पाला देणारी पहिली महानगरपालिका ठरली असून पेंच, कोराडी, खापरखेडा या प्रकल्पातील राखीव पाणी आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होत असून सांडपाण्यावरच प्रक्रिया करून हे पाणी आता नागपूर महानगरपालिकेतील उद्यानासाठी वापरता येणार आहे असे देखील गडकरी यांनी सांगितले. पूर्व नागपूरच्या भांडेवाडी येथील कचरा डेपोतील पार्टिकल वर प्रक्रिया करून त्यामार्फत जैव खतांची निर्मिती सुद्धा आता होत असून या जैव खतांचा वापर केल्याने पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि ही खते रासायनिक खतांना पर्याय ठरतात असे त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जैवभारापासून, कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मिती शक्य असून महानगरपालिकेने आपल्या ताफ्यातील वाहने ही पेट्रोल डिझेलवर ऐवजी सीएनजी, बायो एलएनजी अशा अपारंपारिक इंधनांवर संचलित करावी अशी सूचना गडकरींनी दिली. स्वच्छतेचे महत्व सांगताना त्यांनी स्वतः स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की नागपूर महानगरपालिकेद्वारे 60 शौचालयांचं बांधकाम शहरात चालू असून यापैकी 3 स्मार्ट शौचालयाचे लोकार्पण आज गडकरींच्या हस्ते होणार आहे. महानगरपालिका आत्मनिर्भर वार्ड, स्वच्छ वार्ड, वर्टीकल गार्डनच्या माध्यमातून शहराचे सुशोभीकरण यासारख्या उपक्रमांमधून स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमामध्ये निरंतर कार्यरत राहील असे आश्वासन चौधरी यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मार्ट टॉयलेट आणि रिड्यूस, रियूज, रिसायकल – ट्रिपल आर सेंटर यांचे लोकार्पणही करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिला सदस्य, नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
