सरकारी दरपत्रकाला वेशीवर टांगून लावले होते भरमसाठ बिल
मुंबई: कोरोना संक्रमणाच्या या आपत्कालीन काळातही सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर सध्या मोठी व अनेक छोटी रुग्णालयं कोविड रुग्णांकडून वसूल करताना दिसत आहेत. या दरवाढीविरोधात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अँग्री सुपर मॅन नितीन नांदगावकर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील आलिशान व अद्यावत अशा नानावटी रुग्णालय प्रशासनाला दणका देत अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून दिला.
काल असाच दणका त्यांनी मुंबईतील सांताक्रूजस्थित ‘निरॉन’ रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला दिला. एका कोविड रुग्णाच्या मुलाच्या हातात अवाजवी बिल सोपवले होते. या बाबत सदर व्यक्तीने नितीन नांदगावकर यांना या ठिकाणी पाचारण केले. यावेळी नांदगावकर रुग्णालयात पोहोचायला आणि पीपीई किट चा माल यायला एकच वेळ जुळून आली. आधीच त्या महिला रुग्णाचे बिल एका हातात होते आणि दुसऱ्या बाजूला या ‘पीपीई’ किट च्या खरेदीचे बिल. हे किट साधारण ४०० रुपयांना मिळत असताना तुम्ही कोणत्या आधारावर २००० ते ३००० रुपये याचे लावता का? हा पहिला सवाल करतच त्यांनी ‘निरॉन’ रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला धारेवर धरलं. यावेळी येथील डॉक्टरांची भांबेरी उडाली. यानंतर जेव्हा नांदगावकर यांनी रूग्णालयाने दिलेल्या बिलाची व सरकारने ठरवून दिलेल्या दर पत्रकाची पडताळणी केली असता त्यांना हॉस्पिटलने या महिला रुग्णाला ४ लाख रुपयांचे अवाजवी बिल लावल्याचे सिद्ध झाले. या बिलात चक्क ऑक्सिजन चे दरही वेगळे लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपलं पितळ उघडं पडल्याचं निदर्शनास आल्यावर निरॉन इस्पितळाच्या व्यवस्थापनाने सरकारी दरानुसार जेवढे बिल व्हायला हवे तेवढे म्हणजेच ९५,२५८ रुपये घेण्याचे मान्य केले. या संबंध प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आली ती म्हणजे ‘बीएमसी’ चे ऑडिटर आपल्या कामात कुचराई करत आहेत.
नितीन नांदगावकर यांच्या उल्लेखनीय कामाची दखल ‘महाराष्ट्र वार्ता’ डॉट कॉम वेळोवेळी घेत असते व लोकांना नेमकी फसवणूक कुठे होतेय याबाबत अवगत करण्याचं कामही आपल्या परीने करतेय. गेल्याच आठवड्यात आम्ही आपल्याला ‘लॉकडाऊन’ बाबतचं वास्तव डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांच्या एका बंडखोर ब्लॉग मार्फत सांगण्याचा प्रयत्न केला.
आपल्यालाही रुग्णालयात अशाच प्रकारच्या अनुभवांचा सामना करावा लागत असेल तर कासलीच भीडभाड न बाळगता रुग्णालय व्यवस्थापनाला थेट प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा. नाहीतर आपली फसवणूक अटळ आहे.
