नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीमधून हकालपट्टी
नेपाळ: नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांची त्यांच्याच सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. नेपाळची संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ओली यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे. काल पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी सांगितले. माजी प्रधानमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याशी असलेल्या सत्ता संघर्षातून ओली यांनी डिसेंबरमध्ये नेपाळची संसद विसर्जित करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
यामुळे नेपाळमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नेपाळमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा झाली. नेपाळचे माजी प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या गटाने ओली यांच्या संसद विसर्जित करण्याचा निर्णय घटनेचा आणि लोकशाहीच्या यंत्रणेचे उल्लंघन असल्याची टीका केली आहे.
Source – AIR
