जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राची सुवर्णवेध कामगिरी
हंगेरीत बुडापेस्ट इथं आयोजित जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीत नीरज चोप्रानं ८८ पूर्णांक १७ शतांश मीटर लांबीवर भाला फेकत हे पदक मिळवलं. भारताला या स्पर्धेमध्ये मिळालेलं हे पहिलंच सुवर्णपदक असून, त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. नीरज चोप्रा हा क्रीडा जगतातल्या अतुलनीय गुणवत्तेचं प्रतिक आहे, असं सांगत मोदी यांनी त्याचा ध्यास आणि अचूकता या गुणांचं कौतुक केलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही नीरज चोप्राचं या नव्या विक्रमाबद्दल अभिनंदन केलं आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीम याला रौप्य पदक, तर चेकोस्लोव्हाकियाच्या जेकब वाडलेजगॉट याला कांस्यपदक मिळालं. भारताचा किशोर जेना याला पाचव्या, तर डी पी मनू याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतभारताच्या पारुल चौधरी हिला अकरावं स्थान मिळालं. पण २०२४ मधील पॅरीस ऑलीम्पिकस्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. या स्पर्धेत आशियाई विक्रम नोंदवत अंतिमसाठी पात्र ठरल्याबद्दल भारताच्या रिले संघातल्या महम्मद अनास याहिया, अमोज जेकब, महम्मद अजमल वरियातोडी, आणि राजेश रमेस यांचही प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे.
