राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी काल विधानसभा अध्यक्ष नार्वेकारांसमोर सुनावणी पूर्ण
मुंबई, दि. १: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी काल पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा सवाल अजित पवार गटाने या सुनावणीत उपस्थित केला. शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला. राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
