गडचिरोलीत पूल व रस्ते बांधकाम करू नका …. : नक्षलवादयांकडून धमकी
गडचिरोली: काल (बुधवार) १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथे भुसुरुंग लावून १५ जवानांचा बळी घेतला. या भ्याड हल्ल्यातील हुतात्म्यांचे दहन होण्यापूर्वीच आज नक्षलवाद्यांनी सरकारला थेट धमकीच दिली आहे. गडचिरोलीत पूल व रस्ते बांधणी करू नये अशा स्वरूपाची बॅनरबाजी केंद्र आणि राज्यसरकारला उद्देशून उत्तर गडचिरोलीतील गावांमध्ये करण्यात आली आहे.
या बॅनर्सद्वारे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ४० नक्षलवाद्यांच्या तसेच २६ एप्रिल २०१९ रोजी रामको नरोटी हिच्या एन्काऊंटर चा निषेध करण्यात आला आहे. भांडवलदारांवर राग व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.
नेमक्या महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे आधीच संतापाची लाट असताना त्यात आता नक्षलींकडून नव्याने आलेल्या धमकीने भर घातली आहे.
